मुंबई - १ डिसेंबरपासून राज्यातील सर्वच कापूस खरेदी केंद्रांवर कापसाची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
भुसे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कापूस खरेदीसोबत भरड धान्य खरेदीवरही निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. तसेच, यंदा आम्ही सरकारकडून कापसाला ५ हजार ८०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर देणार असल्याचे सांगितले. कापूस एकाधिकार खरेदी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या कापसाला बाजारात चांगला दर मिळत नसेल तर त्यांनी १ डिसेंबरपर्यंत आपला कापूस विकू नये, असे आवाहनही भुसे यांनी केले.
भरड धान्यासाठी केंद्राशी चर्चा करणार
कापसासोबतच राज्यातील शेतकऱ्यांचा मका, भरड धान्याची खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. काही भरड धान्य आणि त्याचे खरेदी दर ठरवण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. यामुळे लवकरच आम्ही केंद्र सरकारशी बोलून त्यावर निर्णय घेणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
देवांचे दर्शन लवकरच घेता येईल
राज्यातील मंदिरे कधी सुरू होतील, यावर प्रश्न विचारला असता भुसे म्हणाले, की सरकारकडून लवकरच यासाठीचा निर्णय घेतला जाणार असून नागरिकांना आपल्या देवांचे लवकरच दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा- वर्ध्यात 'मिशन मास्क' मोहिमेत 1 लाखाचा दंड वसूल; 586 नागरिकांवर कारवाई