मुंबई - चीनसह जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूची लागण महाराष्ट्रातील ९ नागरिकांनाही झाल्याचे समोर येत आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाच जण, पुणे येथील नायडू रुग्णालय आणि सांगली येथे प्रत्येकी तीन अशा एकूण नऊ जणांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांचे नमुने आज प्रयोगशाळेस पाठविण्यात आले आहेत, असे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटवरून माहिती दिली आहे.
आज मुंबई बंदरावर दाखल झालेल्या एका फिलिपाईन्स मधील एम व्ही बौडिका या जहाजावरील (क्रूझ) एका फिलिपाईन्स नागरिकाला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्याकरीता हलविण्यात आले आहे. जहाजावर कर्मचाऱ्यांसह ८२४ जण असून यापैकी कोणीही भारतीय नाही कुणाला कसलीही लक्षणे नाहीत. आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या ६० प्रवाशांपैकी ४९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ५ जण मुंबई येथे तर प्रत्येकी ३ जण सांगली व पुण्यात भरती आहेत, असेही टोपे यांनी सांगितले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६३ विमानातील ३४ हजार २८३ प्रवासी तपासण्यात आले. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे.आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १९३ प्रवासी आले आहेत. १३७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.