मुंबई : राज्यात १ मार्च रोजी एकूण ८१ लाख ३७ हजार ६६२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ७९ लाख ८९ हजार ४३ रुग्ण बरे झाले होते तर १ लाख ४८ हजार ४२१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १ एप्रिलला एकूण ८१ लाख ५५ हजार ८३९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी ८० लाख १ हजार ४४४ रुग्ण बरे झाले होते तर १ लाख ४८ हजार ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दीड महिन्यात १८ हजार १७७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून १२ हजार ४०१ रुग्ण बरे झाले आहेत तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत दीड महिन्यात ५१७७ रुग्ण : मुंबईत १ मार्च रोजी एकूण ११ लाख ५५ हजार ३७४ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ लाख ३५ हजार ५८२ रुग्ण बरे झाले होते तर १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १६ एप्रिल रोजी एकूण ११ लाख ६० हजार ५५१ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ लाख ३९ हजार १३४ रुग्ण बरे झाले होते तर १९ हजार ७५४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. दीड महिन्यात मुंबईत ५१७७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, ३५५२ रुग्ण बरे झाले आहेत तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
घाबरू नका पण काळजी घ्या : देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेने आपल्या यंत्रणा आणि यंत्रसामुग्री सज्ज ठेवली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तसेच गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी मास्क वापरावे, पालिका कार्यालय आणि रुग्णालयात मास्क वापरावे असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची आणि मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये पण काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
रुग्ण पॉझिटिव्हीटी दर ९.४० : राज्यात ६०० ते १ हजार दरम्यान रोज रुग्ण आढळून येत आहेत. रोज २ ते ४ रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकाच दिवशी ९ मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.११ टक्के आहे. रुग्ण पॉझिटिव्हीटी दर ९.४० टक्के आहे तर मृत्यू दर १.८२ टक्के आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.