मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तसेच 25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळणार असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. विमान, ट्रेन आणि रोडने येणाऱ्या सर्व प्रवाशांना हा कोरोना चाचणी करण्याचा नियम लागू असेल, असेही सरकारकडून सांगण्यात आले. आज राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.
म्हणून घेतला निर्णय -
मुंबईसह राज्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. जून नंतर काही प्रमाणात लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात आली. धार्मिक सण, दिवाळी यानंतर पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली मुंबई विमान सेवा बंद करावी तसेच राज्याबाहेरून येणाऱ्या मेल एक्स्प्रेस गाड्यांवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. यावेळी मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे बनवण्याची गरज असल्याचे म्हटले होते. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत रुग्ण संख्येचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. तर रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे म्हटले होते.
लॉकडाऊनचा निर्णय नाही, मात्र, निर्बंध कडक करणार-
राज्यात लॉकडाऊन लागण्या सदर्भात राजेश टोपे यांच्या नावाने माहिती प्रसारीत होत होती. मात्र, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मी जाहीर केला नाही, अथवा मी तसे कुठेही बोललो नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी त्यांच्या फोनवरून संवाद साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करावेच लागेल. मास्कचा वापर करावाच लागेल. सध्या सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा प्रामुख्याने लागू करण्यात येणार आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन जरी लागू करण्याचा विचार नसला तरी शिथील करण्यात आलेल्या निर्बंधांची पुन्हा काटेकोरपण अंमलबजावणी कऱण्यात येईल
गरज पडल्यास विमानसेवा बंद करू - वडेट्टीवार
राज्यातील संख्या वाढली तर दिल्ली गुजरातवरून येणारी रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा बंद करण्याबाबत आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. इतकेच नाही तर, ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला आवश्यकता पडल्यास आंतरराष्ट्रीय विमानसेवाही बंद करण्याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
तुर्तास दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही -
पुणे, औरंगाबाद, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा आढावा घेऊन एकूण संख्या किती वाढते ते बघून आम्ही पुढच्या आठ दिवसात निर्णय घेऊ. आवश्यकता पडली तर सगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावेच लागतील. मात्र, तूर्तास दुसरा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत परिस्थितीनुसार निर्णय - अजित पवार
दिल्लीनंतर कोरोनाचा कहर महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्य सरकारनेही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले, की दिवाळी दरम्यान बाजारात लोकांनी गर्दी केल्यांनी कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. येत्या १० ते १२ दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल. दिवाळीच्या काळात सर्वजण आनंदात होते. त्यामुळे कोरोनाकडे थोडेफार दुर्लक्ष झाले. परंतु आता दिवाळी संपली आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर भागाचीही कोरोना संदर्भातील परिस्थिती काय आहे हे पाहून पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा, की नाही यावर परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे सांगत अजित पवार यांनी राज्यात सध्या तरी लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लक्षणे नसलेल्या प्रवाशांना राज्यात प्रवेश -
ज्या प्रवाशांनी कोरोना चाचणी केली आहे आणि ज्यांची चाचणी निगेटिव्ह आहे त्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांनी चाचणी केली नाही त्यांची अँटिजेंन चाचणी केली जाणार आहे. अँटिजेंन चाचणी निगेटिव्ह आली तर राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ज्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येतील त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले जावे असे परिपत्रकात म्हटले आहे. रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ९६ तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ७२ तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना नोडल आशिकरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.