मुंबई - कोरोनाचे रुग्ण मुंबईत सतत वाढत असून आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री' या घराजवळच एक कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. या संशयित रुग्णाला रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याच्या रिपोर्टची वाट बघितली जात आहे.
वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान आहे. ‘मातोश्री’पासून काही अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या कोरोनाबाबतच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. रिपोर्ट आल्यावरच त्याला कोरोनाची लागण झाली की नाही हे स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या विभागात मुख्यमंत्री राहत असल्याने तातडीने विभागात औषध आणि धूर फवारणी करण्यात आली. हा विभाग पोलिसांनी सील केला आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या चहा टपरीवाल्याला कोणापासून कोरोनाची लागण झाली त्याचा शोध घेतला जात आहे. पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार वांद्रे पूर्व विभागात आतापर्यंत 25 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.