मुंबई- शहर उपनगरातील भगवती आणि शताब्दी रुग्णालयातही आता कोरोनाबाधित तसेच संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. या दोन रुग्णालयांसह कांदिवलीतील कामगार रुग्णालयात मिळून २२० खाटांचे विलगीकरण वॉर्ड तयार केले जाणार आहे. त्या दृष्टीने नुकतेच मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या रुग्णालयाची पाहणी केली होती.
शहरासह आसपासच्या परिसरातील कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांवर शहरातील कस्तुरबा, सेंट जॉर्ज आणि जी.टी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्यामुळे, मुंबई उपनगरातील रुग्णांना दूर जावे लागत आहे. त्यातही लॉकडाऊनमुळे रुग्णांना रुग्णालयात जाणे अवघड होत आहे. त्यातच मुंबई आणि एमएमआरमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. अशावेळी वाढत्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी तसेच जवळच्या जवळ उपचार मिळावेत यासाठी बोरिवली-कांदिवलीमध्ये भगवती आणि शताब्दी रुग्णालयात उपचार व्यवस्था करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केली होती.
ही मागणी मान्य झाली असून आता शताब्दी रुग्णालयामध्ये ६०, कांदिवली कामगार रुग्णालयात ६० तसेच भगवती रुग्णालयामध्ये १०० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे, लवकरच वर उल्लेख केलेल्या तिन्ही रुग्णालयात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. दरम्यान, भगवती रुग्णालयाजवळ रुस्तमजी कॉम्प्लेक्समध्ये ११० खाटांचे एक मॅटर्निटी होम धूळ खात पडून आहे. तेव्हा या रुग्णालयातही विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी जुन्नरकर यांनी केली आहे.
हेही वाचा- अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध