मुंबई- राज्यात दिवसभरात कोरोनाचे 9 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 26 झाली आहे. आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी मधून भारतात येतील त्यांना 14 दिवसांकरिता विलगीकरण करण्यात येत आहे. अशा एकूण 4 प्रवाशांना शुक्रवारी विलगीकरण करण्यात आले. यापैकी एकाला पुण्यात विलगीकरण कक्षात, तर इतर तिघांना मुंबईत दाखल करण्यात आले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
9 कोरोनाबाधित नवीन रुग्ण आज आढळले. त्यातील 4 जण हे पुणे येथील पहिल्या 2 बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी 1 रुग्ण अहमदनगरला, 2 यवतमाळला तर एकावर मुंबईत उपचार सुरू आहेत. या चौघांशिवाय मुंबईत आणखी 4 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात दाखल असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.
मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाईन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे दाखल असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक रुग्ण करोनाबाधित असल्याचा अहवाल आज इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला आहे. आज कोरोनाबाधित आढळलेल्या 9 रुग्णांपैकी 1 महिला आहे. राज्यात आज 131 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
येत्या 14 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 494 विमानांमधील 1 लाख 73 हजार 247 प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 949 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 663 जणांना दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत दाखल करण्यात आलेल्यापैकी 538 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर 26 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 17 जण पुणे येथे, तर 72 जण मुंबईत दाखल आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे 9 आणि वाय. सी. एम. रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे 3 संशयित रुग्ण दाखल आहेत.