मुंबई - मुंबईत झपाट्याने वाढलेली कोरोना रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. तब्बल ८ ते ११ हजारांवर गेलेली रुग्णसंख्या आता एक हजार ते १३००वर आली आहे. तर, दुसरीकडे ३५ ते ४०वर घसरलेला रुग्ण दुपटीचा कालावधीही २६९ इतका वाढला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीच्या १५ तारखेपासून झपाटयाने वाढत गेली. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाल्याने पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. १ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ९६ दिवसांवर घसरला होता. यावेळी ३९०८वर रुग्णसंख्या होती. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या घटत गेली आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढत गेला. दोन दिवसांपूर्वी रुग्णसंख्या मोठ्या फरकारने कमी होऊन ९५०वर आली आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी २६९ इतका वाढला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईतील कोरोनाने बिघडलेली स्थिती सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
काय उपाययोजना केल्या
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले, क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध, नियमांच्या कठोर अंमलबजावणीला सुरुवात, रोज २५ ते ३० हजारापर्यंत चाचण्या, एका रुग्णामागे १५ क्लोज कॉटॅक्टला क्वारंटाइन करण्यात येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील गर्दी कमी झाली आहे. याचा फायदा होऊन रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठा, रेल्वेस्थानके, बसस्थानके आदी गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पालिकेने नियमांची कडक अंमलबजावणी आणि प्रभावी उपाययोजना राबवल्याने रुग्णांवर नियंत्रण येत असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - सोनाली कुलकर्णी वाढदिवशीच चढली बोहल्यावर, फक्त १५ मिनिटांत उरकले लग्न!
हेही वाचा - ओएनजीसीला वादळाची कल्पना होती; मग कर्मचाऱ्यांना बार्जवर ठेवलेच का? - नबाव मलिक