मुंबई - लॉकडाऊनच्या भीतीने नागरिकांनी पॅक फूडचा अर्थात बिस्कीट, चहा-कॉफी, मसाला अन्य अन्नपदार्थांचा साठा करून ठेवला आहे. तर दुसरीकडे पॅक गुड, बेबीफूडच्या उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात आठवडाभर पुरेल इतकाच साठा वितरकांकडे असल्याने अन्न पदार्थांची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. ही भीती लक्षात घेत कंपन्या आणि वितरकांनी राज्य सरकारकडे धाव घेत आपल्या अडचणी मांडल्या आहेत. तर सरकारने याची दखल घेत नोडल ऑफिसरच्या माध्यमातून या अडचणी सोडवत पॅक फूडचा पुरवठा वाढण्याचा दावा केला आहे.
लॉकडाऊनमुळे 80 टक्के कामगार कामावर नाहीत. तर जो 20 टक्के कामगार आहे, त्यांना पास मिळत नाही. पास असो वा नसो अनेक ठिकाणी त्याना अडवले जाते, मारहाण होते. या आणि अशा अनेक समस्या आहेत. या सोडवल्या गेल्या नाही तर अन्न पदार्थांचा मोठा तुडवडा निर्माण होईल असे म्हणत कंपन्या आणि वितरकांनी दोन दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे धाव घेतली.
यावेळी झालेल्या बैठकीत या सर्व समस्या सोडवण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक (अन्न), मुख्यालय शैलेश आढाव यांची राज्य नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात एफडीएचा नोडल ऑफिसर असेल. हे नोडल ऑफिसर आवश्यक ती मदत करत त्यांच्या अडचणी सोडवणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत पॅक फूड, बेबी फूड मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असा दावा केला जात आहे.