मुंबई: मुंबईमध्ये गेले अडीच वर्षे कोरोनाचा (Corona Virus in Mumbai) प्रसार होता. या कालावधीत कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या. मे च्या दुसऱ्या आठवड्यात चौथी लाट आल्यानंतर जून पासून मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी खालावत चालला होता. जून महिन्यात रोजची रुग्णसंख्या २ हजारावर गेली होती. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ११ जून रोजी ५६१ दिवसांवर आला होता. गेल्या काही महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने १८ सप्टेंबरला रुग्णदुपटीचा कालावधी ४६५० दिवसांवर पोहचला आहे.
कोरोना पसरला : मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढली. त्यामुळे पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. पहिल्या लाटेत रुग्णसंख्या २८०० वर गेली होती. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या ११ हजारावर तर तिसऱ्या लाटेत २१ हजारावर पोहचल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले. मात्र प्रभावी उपायोजना, उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी, संशयित रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, नियमित हेल्थ कॅम्प, लसीकरण मोहिम आदी उपाययोजनांमुळे कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्याचा प्रयत्न झाला .
रुग्ण दुपटीचा कालावधी : तिसऱ्या लाटेनंतर मार्च महिन्यात दिवसाला ३० ते ४० रुग्ण आढळून येत होते. त्यावेळी २४ मार्चला रुग्ण दुपटीचा कालावधी २१ हजार ८६५ दिवस इतका नोंदवला गेला होता. मात्र या वर्षी पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढू लागली. २५ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ३९७३ वर गेला होता. जूनमध्ये रोजची रुग्णसंख्या २ हजारावर गेली. यामुळे ११ जूनला रुग्ण दुपटीचा कालावधी ५६१ दिवसांवर घसरला होता. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. यामुळे १८ सप्टेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी ४६५० दिवस इतका नोंदवण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असल्याने कोरोना आटोक्यात असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
११ लाख ४८ हजार रुग्णांची नोंद : मुंबईत २० मार्च २०२० पासून १८ सप्टेंबरपर्यंत कोरोनाच्या एकूण ११ लाख ४८ हजार ९४५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २८ हजार ०६८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११५४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४६५० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१५ टक्के इतका आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी : रुग्णसंख्या कमी झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतो. रुग्णसंख्या वाढल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होतो. रुग्णांच्या संपर्कात येणा-या रुग्णांचा वेगाने शोध, कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी, चाचण्या, आरोग्य शिबिरे, उपचार पद्धती, सर्वेक्षण, क्वारंटाईन आदी नियमाची कडक अंमलबजावणीमुळे रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. मुंबईकरांनी दिलेली साथ आणि नियमांचे केलेले पालन तसेच हर्ड ह्युमिनीटी तयार झाल्याने सध्या प्रती दिवस १०० ते २०० रुग्ण नोंद होत आहेत. यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी सतत वाढत असल्याचे सांगण्यात आले.