मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचा विषाणूचा प्रसार वाढायला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात 9 जिल्हे तर मुंबईमध्ये 24 विभागापैकी 6 विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट : राज्यात काल 28 मार्चला 450 रुग्णांची तर 3 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 81 लाख 42 हजार 509 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1 लाख 48 हजार 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून सध्या 2343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई 663, ठाणे 429, पुणे 604, नाशिक 76, सोलापूर 66, नागपूर 54, सांगली 50, अहमदनगर 47, कोल्हापूर 38 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईतील हॉटस्पॉट ठिकाण : मुंबईत 663 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामधील 21 मार्च ते 27 मार्च या आठवडाभरात के वेस्ट अंधेरी पश्चिम 64, डी विभाग ग्रँट रोड 54, एच वेस्ट बांद्रा 54, एल कुर्ला 38, एस भांडुप 31, ए विभाग 32 ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये सात दिवसात 0.0078 टक्के सरासरी पॉजिटिव्हिटी रेट आहे. त्यापेक्षा पालिकेच्या 24 विभागांपैकी एस, के वेस्ट, के इस्ट, एफ साऊथ, एफ नॉर्थ, एल, एच वेस्ट, डी, सी, बी, ए या 11 विभागात पॉजिटिव्हिटी रेट अधिक आहे.
नव्या व्हेरियंटचे रूग्ण वाढले : राज्यात कोरोनाच्या एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटचे 230 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील पुणे जिल्ह्यात 151, औरंगाबाद जिल्ह्यात 24, ठाणे जिल्ह्यात 23, कोल्हापूर जिल्ह्यात 11, अहमदनगर जिल्ह्यात 11, अमरावती जिल्ह्यात 8, मुंबईत 1, रायगड मध्ये 1 रुग्ण आढळून आले आहेत. एक्सबीबी 1.16 या व्हेरियंटने एका रुग्णाचा मृत्यू झाला असून बाकी सर्व रुग्ण बरे झाले आहेत. ज्या जिल्ह्यात रुग्ण आढळून आले आहेत, तेथे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रूग्णसंख्या वाढण्याचे कारण : जगभरात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना विषाणूने गेल्या तीन वर्षात स्वत:हून सातत्याने बदल घडवला आहे. व्हायरसमध्ये बदल झाल्यावर रुग्णसंख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. आताही व्हायरसने आपल्यामध्ये बदल केला आहे. नागरिकांनी लस घेऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे अँटीबॉडीजचा स्थर कमी झाला आहे. काही दिवसांनी नागरिकांच्या शरीरातील अँटीबॉडीज पुन्हा सक्रिय झाल्यावर रुग्णसंख्या आटोक्यात येईल. तो पर्यंत रुग्णसंख्या वाढताना दिसणार असल्याची माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखा सचिव डॉ. भरत जगियासी यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यात 76 कोरोना रूग्ण
अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना वाढायला लागला आहे. तापेचे रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत असून महिनाभरात एकूण 1492 रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी 76 जणांना कोरोना असल्याचे आढळून आले आहे. कोरोना सोबतच एच थ्री एन टू आणि व्हिक्टोरिया या आजाराचे रुग्ण देखील आढळून आले असल्याने पुन्हा एकदा सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात एकूण 34 कोरोना रुग्ण आहेत यापैकी अमरावती शहरात 31 रुग्ण आहेत आणि तीन रुग्ण हे ग्रामीण भागात आहेत. इन्फ्लुएंजा ए चा घटक असणाऱ्या एच थ्री एन टू चे अमरावती जिल्ह्यात पाच रुग्ण आढळून आले आहेत. तथा इन्फ्लुएंजाबी व्हिक्टोरिया लिनेजचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यासह 55 सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या 55 पैकी एक्स बीबी वन चे दोन स्ट्रेन आहेत तर एक्स बीपी टू चे तीन आणि एक्स बीबी 1.5 चे दोन आणि एक्स बीबी आणि एक्स बीपी 2.4 चे अकरा स्ट्रेन अमरावती सापडले असल्याची माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना चाचणी केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा : Girish Bapat Passed Away : खासदार गिरीश बापट यांचे निधन! वाचा, खडतर राजकीय प्रवास