मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हातावर काम असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. मुंबईत लाखो रिक्षाचालक आहेत. मात्र, लाॅकडाऊनमुळे त्यांचेही आर्थिक गणित कोलमडल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, लॉकडाउन अधिक कडक करणार - राजेश टोपे
मुंबई उपनगरात अडीच लाख रिक्षाचालक आहेत. लॉकडाऊन काही भागात वाढण्याची शक्यता आहे. आता, दिवस कसे काढायचे असे बोलायची वेळ रिक्षावाल्यांवर आली आहे. ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी देखील रिक्षा चालकांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व धंदे ठप्प झाले. यात सर्वात जास्त हातावर पोट असणाऱ्या कामगारांना याचा फटका बसला. रिक्षा चालक दिवसभर रिक्षा चालवतो. कमावलेल्या पैशावर त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र, लाॅकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा धंदा बंद झाला आहे. त्यामुळे देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात जावे, अशी आशा रिक्षाचालक व्यक्त करत आहेत.
आम्ही आमच्या युनियनच्या माध्यमातून काही रिक्षाचालकांना रेशन किट पुरवत आहोत. एक महिना होत आला रिक्षा बंद होऊन चालकांच्या खिशात पैसा नाही. सरकारने रिक्षाचालकासाठी आर्थिक मदत जाहीर करावी, असे आवाहन आम्ही राज्य सरकारकडे केले, असे शशांक राव यांनी सांगितले.
खूप बिकट परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे. धंदा बंद असल्यामुळे खिशात पैसे उरले नाहीत. काय खायचे हा प्रश्न दररोज उपस्थित होत आहे. सरकार कोरोना विरुद्ध लढण्यासाठी चांगल्या उपाययोजना राबवत आहे. परंतु, आम्हा गरीब रिक्षाचालकांवर देखील उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे ,अशी विनंती रिक्षाचालक दीपक शिवलकर यांनी केली.
ट्रक चालकांचीही परिस्थिती बिकट...
मुंबईतील मालाची आयात- निर्यात करण्यासाठी हजारो ट्रक मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात धावतात. लॉकडाऊनमध्ये सगळे थांबले आहे. लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ट्रकवर काम करणारे चालक मोठ्या संख्येने परराज्यातील आहेत. यामुळे तेही मुंबईत अडकून आहेत. सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या ड्रायव्हरची राहण्याच्या आणि खाण्याच्या खर्च करत आहोत. परंतु, आमच्यावरही आर्थिक बोजा वाढत आहे. या दिवसात ट्रक पार्कींगचे 100 रुपये द्यावे लागतात. सरकारने आमच्या कामगारांची तरी खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसेच पुढे येणाऱ्या दिवसात वाहनांच्या विमाच्या पैशात सूट मिळाली पाहिजे. करामध्येही सूट मिळावी, अशी विनंती आम्ही सरकारकडे करत आहोत. ट्रक वाहतुकीकडे नेहमी दोन्ही सरकारने दुर्लक्ष केले आहे, असे ढमाले ट्रान्सपोर्टचे शंकर ढमाले यांनी सांगितले.