सातारा - पालिकेशी संबंधित वादग्रस्त क्लिपमध्ये उच्चारलेल्या नावांच्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठेकेदाराची अनामत रक्कम परत करण्यासाठी दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना पोलिसांनी मंगळवारी रंगेहाथ पकडले होते. यात आरोग्य निरीक्षक गणेश टोपे यांच्यासह प्रवीण यादव यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेशी संबंधित ३ महिन्यांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पालिकेतील लाचखोरी प्रकरणातील उपमुख्याधिकाऱ्यासह तिघांची आज न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, व्हायरल वादग्रस्त क्लिपमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होतो. त्यामुळे, संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. यातील काहींचे फोन कालपासूनच बंद झाले आहेत.
संबंधितांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे पोलिसांतील संपर्क सुत्रांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने तिन्ही संशयितांना विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यातील चौथा संशयित वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे अद्याप फरार आहे.