मुंबई - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहीमेत आता अभिनेता अक्षय कुमारही सहभागी झाला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी अक्षयने वर्गणी दिली आहे. खुद्द त्यानेच एक व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली. सोबत लोकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
भव्य राम मंदिर निर्माणासाठी पुढे येऊन योगदान द्या -
अक्षयने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अयोध्येत आपल्या प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिर उभारणीचे काम सुरु झाले आहे. याचा खूप आनंद आहे. आता आपले योगदान देण्याची वेळ आहे. मी वर्गणी देऊन सुरुवात केली आहे. तुम्हीही या मोहिमेत सहभागी व्हा, असे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. सध्या भारतभर राम मंदिर निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण देशभरात यासाठी वेगवेगळ्या स्वरूपात कार्यक्रम केले जात आहे. ज्या प्रकारे राम सेतू बांधणीसाठी वानरसेनेने प्रयत्न केले. त्याच प्रकारे आपणही भव्य राम मंदिर निर्माणासाठी पुढे येऊन आपले अमूल्य योगदान द्यावे, असेही त्याने म्हटले आहे.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपचा दारुण पराभव; शिवसेनेने मारली बाजी