मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अभ्यासक्रमाचे पुरेसे आकलन झाले नव्हते. त्यामुळे प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. प्रश्न प्रकारचा सराव आणि प्रश्नांची माहिती व्हावी यासाठी प्रश्नपेढी विकसित केली आहे. ती प्रश्नपेढी या https://maa.ac.in/index.php tc=prashnpedhi संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची चिंता मिटली
दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल मध्ये जाहीर करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना शाळा - महाविद्यालयात जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे ऑनलाईन शिकवलेल्या अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांच्या शंका दूर करणे शिक्षकांनाही शक्य झालेले नाही. यापार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाईन प्रश्नपेढी उपलब्ध केली आहे. पहिल्या टप्प्यात बारावीच्या वाणिज्य शाखेचे गणित, इतिहास, इंग्रजी. तर विज्ञान शाखेच्या गणित, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इंग्रजी आणि कला शाखेचे इतिहास, भूगोल, गणित या विषयाचे 8 प्रश्नसंच उपलब्ध आहे. तसेच दहावीच्या परीक्षेचे गणित भाग १, इतिहास आणि राज्यशास्त्र भूगोल, असे यातील ८ विषयांचे प्रश्नसंच पहिल्या दिवशी उपलब्ध केले आहे. उर्वरित विषयांचे प्रश्नसंच लवकरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्ना बाबतची सर्व माहिती उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.
संकेत स्थळाला विद्यार्थ्यांची भेट
या प्रश्न पेढी संकेत स्थळावर उपलब्ध करून दिल्यामुळे दोन दिवसात तब्बल ९४ लाख १३ हजार ७६९ हिट संकेत स्थळाला मिळालेले आहे. राज्यभरात दहावीसाठी सुमारे १७ लाख विद्यार्थी बसणार आहेत. ही परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या काळात पार पडणार आहे. तर बारावीची परीक्षा २३ ते ३१ मे याकाळात होणार आहे. शिवाय या परीक्षेला सुमारे १५ लाख विद्यार्थी बसणार आहे.
हेही वाचा-आता मुंबई विद्यापीठात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल