मुंबई - संभाजी बिग्रेड संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे. यावेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणसह राज्यातील मोठे काँग्रेस नेते उपस्थित होते. पुण्यातून प्रवीण गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काँग्रेस निवडणूक कार्यकारिणीची बैठक शनिवारी टिळक भवनमध्ये झाली. या बैठकीत पुणे आणि सांगली मतदारसंघातील उमेदवारीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यात रावेत लोकसभेसाठी उल्हास पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सांगली लोकसभेची जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे मतदारसंघातील उमेदवाराचे नावावर अजुनही निर्णय घेतला नसून उमेदवार आज संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी, संभाजी बिग्रेड संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेस त्यांना उमेदवारी देईल, अशी चर्चा आहे.
राहुल गांधी ५ एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ५ एप्रिलला राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, या बैठकीला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कृपाशंकर सिंह यांच्यासह मोठे नेते उपस्थित आहेत.
निवडणुकीच्या काळातच काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर
मागील काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कामकाजावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याची हायकमांडकडून गंभीर दखल घेण्यात आली असून दिल्लीहून आज महाराष्ट्र निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल हे नेते यांच्यासह मल्लिकार्जुन खरगेही वाद मिटवण्यासाठी दिल्लीहून आले आहेत. त्या बैठकीत चव्हाण यांच्या कामकाजावर अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे.