मुंबई - इंधन दरवाढीवरून काँग्रेस पक्ष सध्या राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन करत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात शनिवारी येथेही आंदोलन पार पडले. यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगताप ही खाली पडले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.
- माणसाने झेपेल तेवढंच करावं - प्रसाद लाड
...... भार उचलायला, 'बैलांचा नकार! तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंच करावं! असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!" अशी आक्षेपार्ह टीका लाड यांनी केली आहे. अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे? असा सवाल देखील प्रसाद लाड यांनी केला आहे.
- राहुल गांधी यांच्याबद्दलच्या घोषणा बैलांनाही सहन झाल्या नाहीत - प्रविण दरेकर
काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचं कस हसं झालं, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीलं आहे. राहुल गांधी यांच्याबद्दलच्या घोषणा बैलांना देखील सहन झाल्या नाहीत, हेच यावरून दिसून येते. असे ट्वीट करत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर कॉंग्रेसवर टीका केली आहे.
- तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतले - केशव उपाध्ये
तोल सांभाळा. महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा. अशा टोला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करुन कॉंग्रेसला लगावला आहे.
- काय आहे संपूर्ण प्रकार -
वाढत्या इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात कॉंग्रेस आणि आक्रमक झाली आहे. शनिवारी दुपारी अंटोप हिल भरणी नाका या ठिकाणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात बैलगाडीत सिलेंडर घेऊन अनेक कार्यकर्ते उभे राहिले. भार जास्त झाल्याने ही गाडी एका बाजूला झुकली आणि भाई जगताप यांच्यासह अनेक जण खाली कोसळले सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या सगळ्या प्रकारामुळे काँग्रेसच्या या आंदोलनावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.