मुंबई - राज्यात भाजपने सत्ता गमावल्यानंतर झारखंडमध्येही झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनत दलाला जास्त जागा मिळाल्या. यामुळे त्याठिकाणी काँग्रेसचेच सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर येथील मुंबई काँग्रेस कार्यालयात अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या उपस्थितीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
झारखंडमध्ये ज्या प्रकारे विजय मिळाला आहे. तसाच विजय देशभरात होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला मिळणार आहे. मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार आहे. संपूर्ण देशभर काँग्रेस परत येईल, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा - अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...
झारखंडमध्ये 81 जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 41 पेक्षा जास्त जागांवर पुढे आहेत. यावरून काँग्रेस आणि मित्रपक्ष बहुमत सिद्ध करणार, हे स्पष्ट झाले आहे. यानंतर काँग्रेसच्या गोटात आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात असलेल्या राजीव गांधी भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेढे भरवत फटाके वाजवत आनंद साजरा केला.