मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली होती, असे आयआयएमएस पॅनेलचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी अधिकृतरित्या सांगितले आहे. यामुळे या प्रकरणावर महाराष्ट्राची अहोरात्र बदनामी करणाऱ्या भाजप आणि आयटी सेलच्या मास्टरमाइंडची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
सुशांतसिंह प्रकरणी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनंतर सावंत यांनी ट्विट करून भाजप आणि भाजपच्या आयटी सेलवर जोरदार हल्ला चढवला. सुशांतने आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती दिल्यानंतर तपास केल्याने हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेला तपास प्रामाणिकपणे सुरू होता, हे देखील स्पष्ट होते. मात्र, तरीही 'गोदी मीडिया' आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र केंद्र सरकारही करत होते, असा आरोपही सावंत यांनी केला.
हेही वाचा - भारतात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला 1 लाखाचा टप्पा; बाधितांचा आकडा 64 लाखांवर
सुशांतसिंह प्रकरणावरून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान कालपर्यंत काही वाहिन्यांकडून करण्यात आले. या प्रकरणात 'आयपीसी 302'च्या बनावट आणि खोट्या बातम्या दिल्या जात होत्या. दुसरीकडे भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत राहिले. सीबीआय आणि अन्य एजन्सीज बनावट माहिती गोळा करत राहिल्या. यामुळे महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी ज्या लोकांनी षडयंत्र रचले, त्यांची चौकशी करण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने एसआयटी स्थापन करावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. या वाहिन्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी केली आणि लोकशाहीचा गळा घोटला अशा वाहिन्यांवरही सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.