मुंबई - अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन संपादनाच्या कामात घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. दोन कोटी रुपयाची जमीन अवघ्या काही मिनिटातच साडे अठरा कोटी रुपयांना विकत घेऊन मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सर्व मर्यादा सोडून लज्जाहिनतेने भाविकांच्या श्रद्धेशी चालवलेला हा खेळ आहे. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रामाच्या नावावर लोकांच्या भावनेशी खेळून चंदा गोळा करण्याचा धंदा चालवलेला असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
रामाच्या नावावर पैसा वसुलीचा धंदा सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही अनेकदा निदर्शनास आणून दिले आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपणच असल्याच्या अविर्भावात रामाच्या नावाने खुलेआमपणे पैसे कमावून लोकांच्या श्रद्धेशी खेळ चालवला आहे. बाबा हरिदास यांची मूळ जमीन सुल्तान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांनी दोन कोटी रुपयांना विकत घेतली आणि तीच जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला साडे अठरा कोटी रुपयांत विकण्यात आली. हा व्यवहार फक्त काही मिनिटांत झाला. एवढ्या कमी वेळात एका जमीनीचे भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात कसे काय वाढू शकतात. या जमीन व्यवहारासाठी एवढा मोठा मोबदला देऊन राम मंदिरासाठी पैसे दिलेल्या लोकांचा विश्वासघात केला आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात असताना भाजपा व आरएसएसने देखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा केले. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता काँग्रेसने जानेवारीमध्येच व्यक्त केली होती, असे सचिन सावंत यांनी सांगितले.
भाजपा व संघ परिवाराने राम मंदिरासाठी यापूर्वीही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिरासाठी जमा केलेले 1 हजार 400 कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला. अखिल भारतीय हिंदू महासभेने 2015 साली विश्व हिंदू परिषदेतर्फे 1 हजार 400 कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही. 4 जानेवारी, 2021 रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीसाठी निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला होता. गेल्या तीन दशकामध्ये राम मंदिरासाठी जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही. रामाच्या नावावर खोट्या पावत्या, वेबसाईट निर्माण करून लोकांकडून पैसे वसूल केले गेले त्याचा कोणताच हिशोब नाही, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
हेही वाचा - कारवाईच्या इशाऱ्यानंतरही राजकीय बॅनरबाजी, महापालिकेची कारवाई सुरू