मुंबई - ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिले. त्यांचेच नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथे मंदिर सुरू करण्यासाठी जे आंदोलन केले त्यात कायदा मोडणे हे दुर्दैवी होते, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
राज्य सरकारकडून कोरोना आणि परिस्थिती लक्षात घेऊन मंदिर खुले करण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, आता सध्याची परिस्थिती भाजपकडून लक्षात घेतली जात नाही, असा आरोप सावंत यांनी केला.
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आणि दुसरीकडे उत्तराखंड, केरळ या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर भाजपची भूमिका ही वेगळी होती. राज्यातील कोरोनाची संख्या वाढत असताना भाजप आणि त्यांची येथील भूमिकाही वेगळी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपचे मंदिर खुले करा म्हणून आंदोलन केवळ राजकारणाचा एक भाग असल्याचे ते म्हणाले.
सुशांतसिंह प्रकरणात सध्या नाव चर्चेत असलेल्या संदीप सिंह यांनी भाजप कार्यालयात 53 वेळा फोन केला होता. त्यांनी हा कोणाला फोन केला होता, ती व्यक्ती कोण होती, याची चौकशी करावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या संदीप सिंहवर यापूर्वी काही आरोप होते. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बायोपिक बनवण्याचे काम कसे मिळाले, त्याची कंपनी ही आर्थिक डबघाईला येत असताना गुजरात सरकारने त्याच्या कंपनीला 117 कोटी रुपये देण्याचा करार कसा केला, याविषयी भाजपचे कोणते नाते यामागे आहेत, याची चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली.
हेही वाचा - विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करा; वंचित आघाडीसह वारकरी सेनेचे पंढरपुरात आज आंदोलन