मुंबई - शिवसेनेसोबत सरकार बनवण्यासाठी आपली काही हरकत नाही. यापुढेही आपण काँग्रेस आघाडीसोबत राहू असे आघाडीच्या मित्र पक्षांच्या वतीने सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी मित्र पक्षांची बैठक पार पडली. यात संभाव्य सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. तेव्हा मित्र पक्षांनी आपली सहमती व्यक्त करत काही मागण्याही मांडल्या.
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही आघाडी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही आघाडीसोबत राहू असे आघाडीच्या मित्र पक्षांनी सांगितले. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, बीआरएसपीचे डॉ. सुरेश माने, जनता दलाचे ( धर्मनिरपेक्ष) जयंत बने आदी उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी यांची भूमिका मात्र समजू शकली नाही.
हेही वाचा - किशोरी पेडणेकर; नर्स ते मुंबईच्या महापौरपदापर्यंतचा प्रवास
डॉ. माने यांनी सांगितले,की आम्ही आघाडीसोबत निवडणूकीपूर्वी एकत्र होतो. आज काही मुद्द्यांवर आघाडीच्या नेत्यांसोबत अत्यंत सकारात्मक बैठक झाली. तर जनता दल सेक्युलरचे बने म्हणाले, की आम्ही सरकार स्थापन होणार असल्याने सर्वसमावेशक कार्यक्रमासाठी काही मुद्दे देणार आहोत. त्यासाठीचे निवेदन आम्ही सर्वच पक्ष मिळून स्वतंत्ररित्या तयार केले आहे. आमच्या मुद्द्यांचा विचार हा सत्तेत येणाऱ्या आघाडीच्या सर्वसमावेशक कार्यक्रमात समाविष्ट केला जावा अशी आमची मागणी आहे.
हेही वाचा - चर्चा अजून संपली नसून बैठकांचे गुऱ्हाळ राहणार सुरूच..
तर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी म्हणाले, की आपल्याला कोणते मंत्रिपद नको. अथवा आपली कोणती मागणीही नाही. मात्र भाजपसारख्या धर्माधारित पक्षाला दूर ठेवण्यासाठी आपण शिवसेना सामिल असलेल्या आघाडीला बिनशर्त पाठिंबा देत आहोत. त्यासाठीच आपण आज बैठकीला उपस्थित होतो अशी माहिती आझमी यांनी दिली.