मुंबई - कर्नाटकामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील महाआघाडीचे सरकार अडचणीत आले असून शनिवारी ११ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे ११ आमदार मुंबईतील सोफिटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या भेटीला काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष महेंद्र सिंगी आले आहेत. याबरोबरच भाजपचे आमदार प्रसाद लाडही आमदारांच्या भेटीला आले आहेत.
महेंद्र सिंगी कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांना भेटले. त्यांच्यात काहीही नाराजी नाही. पावसाचा मौसम आहे, असे होत राहते. आमचे सरकार टिकणारच. पक्षामध्ये अंतर्गत नाराजी आहे, ती दूर होईल, असे सिंगी म्हणाले. त्यांनी आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावरून माघारी आल्यावर सर्वकाही ठिक होईल, असे ते म्हणाले.
कर्नाटकामधील काँग्रेसच्या ८ तर जेडीयूच्या ३ आमदारांनी राजीनामा दिला आहे. सध्या एकूण १३ आमदारांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष व राज्यपालांकडे दिलेला आहे. यातील १० आमदार सध्या मुंबईत सोफिटेल हॉटेल येथे वास्तव्यास आहेत.