मुंबई - सांगली आणि कोल्हापूर या परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती अत्यंत गंभीर असून ती एल-3 प्रकारची आपत्ती आहे. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकार अजूनही गंभीर नाही. त्यामुळे राज्य सरकारने त्यासाठीचा पाठपुरावा करावा. तसेच अधिकाधिक मदत राज्यातील पूरग्रस्त भाग आणि दुष्काळ भागाला मिळवून द्यावी, अशी मागणी आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून मोठी मदत मिळाली पाहिजे. केंद्राकडे ६ हजार ८०० कोटी रुपयांची मदत मागण्यात आली आहे ती अपुरी आहे. त्यामुळे सध्या सरकारने आकस्मित निधीतून रक्कम काढून तातडीने लोकांना मदत पुरवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली असल्याचे थोरात म्हणाले. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 60 हजार रुपये तसेच त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आदेश तातडीने देण्यात यावे, अशी मागणीही आज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६० हजार रूपये मदत द्यावी. बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावीत, या व इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार शरद रणपिसे, प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले आदी उपस्थित होते.