मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार म्हणून आघाडीच्या आणि विशेषता काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा फोटो लावला जातो. परंतु, शिवसेनेकडून मात्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा कधी फोटो का लावला जात नाही, असा प्रश्न काँग्रेसचे नेते व मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.
शिवसेनेला सत्तेत बसल्यानंतरही काँग्रेसबद्दल कसलीही मित्रपक्ष म्हणून आपुलकी नाही. केवळ संधीसाधूपणा करण्यासाठी सत्तेत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी व भाजपाला भीती दाखवण्यासाठी आणि इशारा देण्यासाठी शिवसेनेने ही संधी साधली आहे. परंतु, शिवसेनेच्या मनात काँग्रेसबद्दल कुठेही आपुलकी अथवा जिव्हाळा किंचितसुद्धा नाही, असेही निरुपम यांनी सांगितले.
हेही वाचा - 'शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार, शिवसेना आमच्या सोबत'
दरम्यान, परवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांच्या एका हॉटेलमधील भेटी संदर्भात राज्यात अनेक चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निरुपम यांनी एक ट्विट करून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेच्या कंपाउंडरला रोज हेडलाईन करण्याची भूक लागली आहे आणि हीच भूक येत्या काळात अनेक नेत्यांना खाऊन टाकेल. हे दुर्दैव नाही परंतु हेच वास्तव आहे, अशा प्रकारचे ट्विट करून निरुपम यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.