मुंबई Ashok Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक वक्तव्य तसंच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे.
अशोक चव्हाण यांच्या बद्दल चर्चा : अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होत्या. सहा महिन्यांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतरही अशोक चव्हाण लवकरच भाजपामध्ये जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर हे प्रकरण हळूहळू पडद्याआड गेलं होतं. मात्र, परत अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
चिखलीकर यांच्या वक्तव्यांनं पुन्हा धुरळा : भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावर बोलताना चिखलीकर म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं मदत केली नव्हती. आमच्या सरकारनं त्यांच्या साखर कारखान्याला दीडशे कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळं ते भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरच पक्षात प्रवेश करणार आहेत.
अनेक जण भाजपाच्या संपर्कात : या संदर्भात प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणाले की, इतर पक्षातील अनेक नेते भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहे. भारतीय जनता पक्ष इतर पक्षांच्या नेत्यांना सामावून घेण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्या संदर्भात आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील.
निरर्थक विषयावर बोलणार नाही : या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रोज उठून कोणी काय बोलतं, यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. या विषयावर मी माझं मत आधीच स्पष्ट केलं आहे, मी काँग्रेससोबत आहे आणि माझ्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळं याबाबत खुलासा करण्याची गरज नाही, असं चव्हाण म्हणाले.
हेही वाचा -