मुंबई - भाजप-शिवसेना सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी जाचक निकष, अटी-शर्ती आणि नियम लागू केले. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तब्बल ३० लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. हे सरकारचे मोठे अपयश असून, हे पाप कोणाचे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
शेतकरी कर्जमाफी योजनेवर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीचा प्रभावी उपाय म्हणून कर्जमाफी योजना लागू करण्याची मागणी केली जात होती. प्रारंभी दोन-अडीच वर्ष भाजप-शिवसेना सरकारने कर्जमाफी हा एकमेव पर्याय नसल्याची वेळकाढू भूमिका घेऊन कर्जमाफी लागू केली नाही. परिणामी राज्यात रोज सरासरी आठपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करू लागले. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या लढ्यासमोर झुकून मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी योजना जाहीर केली. त्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफीची उपमा दिली गेली. राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असल्याचे ढोल राज्य सरकारने बडवले. मात्र, प्रत्यक्षात आजवर महाराष्ट्रातील एकूण १ कोटी ३६ लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी जेमतेम ३० लाख म्हणजे केवळ २२ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळतो, हे सरकारच्या अनास्थेचे आणि उदासीनतेचे द्योतक असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांप्रती सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकलेले नाही. मागील ३ वर्षात राज्यात तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपविल्याचे राज्य सरकारनेच विधीमंडळात जाहीर केले आहे. ही आकडेवारी सुद्धा शेतकरी कर्जमाफी योजना फसल्याची कबुलीच असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी म्हटले आहे. सरकारला शेतकऱ्यांबाबत थोडी जरी आस्था असेल तर अधिक वेळ न दवडता सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात या निर्णयाची घोषणा करावी आणि अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरेंची बनवाबनवी आता शेतकऱ्यांच्या लक्षात आलीय
शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा अन्यथा सत्तेची आसने खाक होतील, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचाही अशोक चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केल्यानंतर या ८९ लाख शेतकऱ्यांची यादी शिवसेना तपासून घेईल, अशी वल्गना उद्धव ठाकरे यांनी केली होती. कर्जमाफीच्या घोषणेला दोन वर्ष झाली तरी अजून त्यांची ही यादी तपासून झालेली दिसत नाही. आता या अपयशाचे खापर बँकांवर फोडून बँक अधिकाऱ्यांना ‘सरळ’ करण्याची भाषा उद्धव ठाकरे करीत आहेत. पण सत्तेत राहून मलिदा खायचा आणि निवडणूक आली की शेतकऱ्यांची आपल्याला किती कणव आहे, हे दाखवण्यासाठी ‘स्टंट’ करण्याची उद्धव ठाकरेंची बनवाबनवी आता शेतकऱ्यांच्या लक्षात आली असून, पुढील निवडणुकीत शेतकरी यांना उताणे पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.