मुंबई - प्रशासकीय नाकर्तेपणा व भ्रष्टाचारामुळे संपूर्ण मुंबई आतून पोखरली आहे. डोंगरी दुर्घटना हा त्याचाच परिपाक असल्याचे वक्तव्य करत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. नियोजनशून्य कारभाराची किंमत निष्पाप नागरिकांना आपले प्राण देऊन चुकवावी लागत असल्याचे चव्हाण म्हणाले.
डोंगरी दुर्घटनेवरुन अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. मुंबईत दरवर्षीच धोकादायक इमारती कोसळून अनेकांचे मृत्यू होत आहेत. २०१७ मध्ये महानगरपालिकेने ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये या इमारतीचे ऑडिट झाले होते का? ऑडिट झाले असेल तर त्याचा निष्कर्ष काय होता? ऑडिट झाले नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे समोर येणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले.
मुंबई पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तर राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. सध्या त्यांच्या नियोजनशून्य कारभार चालू आहे. या कारभारामुळे कधी पूल तर कधी इमारती कोसळतात. त्यांच्या या कारभारामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत असल्याचे चव्हाण म्हणाले.