मुंबई - राज्य विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक याच सत्रात घ्यावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस पक्षातील आमदार आज (दि. 9) भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
याच सत्रात अध्यक्ष पदाची निवड करा
राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे हे शंभरावे सत्र आहे. त्यामुळे हे पद रिक्त राहू नये, अशी काँग्रेसची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी अध्यक्षपदाची निवडणूक याच सत्रात घ्यावी, आवश्यकता असल्यास एक दिवसाचा सत्र बोलवावे, अशी मागणी करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पद रिक्त
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. हे रिक्त पद भरण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या बैठकांत विषय चर्चेला गेला. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. अशातच शंभरावे अधिवेशनाचे सत्र असल्याने या पदासाठी निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - एनकाऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझेंना अटक करण्याची फडणवीसांची मागणी; वझेंचा प्रतिक्रियेस नकार