मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची पहिली बैठक मंगळवारी मुंबईत होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर दुपारी ३ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह आघाडीतील इतर घटक पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून राज्यातील अनेक जागांवर उमेदवार उभे करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले असून त्यासाठीची प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागली आहे.
काँग्रेसच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा तिढा अजून कायम राहिला आहे. त्यामुळे मंगळवारी होत असलेल्या बैठकीत काँग्रेसला मुंबईचा विषय वगळून राज्यातील इतर जागांवर चर्चा करावी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरांकडे लक्ष देण्याचे आदेश पक्षाला दिलेले असल्याने आघाडीच्या पहिल्याच बैठकीत मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी शहरांतील जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर होत असलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, नसिम खान, यशोमती ठाकूर आदी उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, आमदार हेमंत टकले आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.