मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आमचं ठरलय' म्हणत महायुती वर शिक्कामोर्तब केले असले तरी अजूनही मुख्यमंत्री कोणाचा हे अनुत्तरित आहे. यातच शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. मात्र, युवासेनेचे नेतेही यावर अधांतरीच वक्तव्य करत आहेत.
शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याची चर्चा आहे. सोमवारी युवासेनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता युवासेना सरचिटणीसांनी यावर आपण काही बोलू इच्छित नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आणि जागा वाटपा संबंधात भाजपचे नेते अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असे सांगितले.
आदित्य ठाकरे जिथे प्रचार करतात तिथे शिवसेनेचा विजय नक्की आहे. त्यांनी निवडणूक लढवावी अशी प्रत्येक शिवसैनिकाची आणि युवासेनेची देखील इच्छा आहे. मात्र, निवडणूक लढायची की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली. सध्या आदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेना जनसंवाद यात्रेमार्फत जनतेशी संवाद साधणार आहेत, असे युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी सांगितले.