मुंबई - राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना नेमकी कोणाकडून संधी दिली जाणार, यावरून काँग्रेस आणि शिवसेनेतही संभ्रमाचे वातावरण पसरले आहेत. त्यातच शनिवारी मदत व पुनर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसकडूनही ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली असल्याचा गौप्यस्फोट केल्याने नेमके मातोंडकर यांच्या नावावर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मातोंडकर यांना सुरूवातीला काँग्रेसकडूनच विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपूर्वीच त्यांना शिवसेनेने आपल्याकडून संधी देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच संपर्क साधल्याच्या चर्चा सुरू झाल्याने या विषयावर अधिकच चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, यात मातोंडकर यांच्याकडून अद्यापही कोणता खुलासा न आल्याने नेमकी त्यांना संधी शिवसेनेकडून दिली जाणार की, काँग्रेसकडून हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा - 'भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची "ड्यूटी", शरद पवारच राज्य चालवतात केले मान्य'
मातोंडकर यांना शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शनिवारी काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, आम्ही त्यांना विधानपरिषदेसाठी विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नकार दिला. तर त्या राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, यावर काँग्रेसच्या इतर नेत्यांकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. त्यातच शिवसेनेकडूनही मातोंडकर यांच्या नावाचा कोणताही विचार करण्यता आला नाही. मात्र, त्यावर केवळ चर्चा सुरू करण्यात आल्याचे शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. तसेच ज्यांची नावे निश्चित झाली आहेत, त्यामध्ये शिवसेनेने आपल्या पक्षाशी संबंधित असलेल्यांनाच संधी देण्याचा प्रयत्न केला, असल्याचेही सांगण्यात आले. तर शिवसेनेकडून मातोंडकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचेही चित्र रंगवण्यात येत असल्याचे त्या नेत्यांने सांगितले.