मुंबई - कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था धुळीस मिळते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे टाळ्या वाजवून झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे, मेणबत्त्या लावण्याचे उपदेश करत आहेत. मात्र, त्यांच्याकडे किती जणांचे रोजगार गेले याची माहिती आहे का, असा सवाल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ कॉ. विश्वास उटगी यांनी केला आहे.
देशात २२ मार्चला टाळ्या वाजवीत त्यासाठीचा इव्हेंट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येत्या ५ एप्रिल रोजी मेणबत्या आणि दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. त्यावर देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्यात कोरोनापूर्वीच मंदीचे वातावरण असल्याने अनेक उद्योग बंद पडले होते. यामुळे अनेक जण अडचणीत आले होते. गेल्या 45 वर्षांत भारतात कधी नव्हे एवढी बेकारी आलेली आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही अशी परिस्थिती समोर आली आहेत. देशात आणि राज्यात लॉकडाऊनमुळे नोकऱ्या जात आहेत अशांची संख्या साधारणपणे एक कोटींपेक्षा अधिक असून त्यांच्यासाठी केंद्र सरकार काय करणार आहे? असा सवालही उटगी यांनी केला.