मुंबई Govind Pansare Murder Case : न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी (21 डिसेंबर) कॉ. पानसरे प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या हत्येच्या खटल्याची प्रगती सांगण्यापेक्षा तपासात काय प्रगती केलीत हे दाखवा, असं मुंबई उच्च न्यायालयानं दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) सुनावलं. एटीएसच्या संथ कारवाईवर नाराजी व्यक्त करत त्यांनी सादर केलेला अहवालही मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करुन घेण्यास नकार दिला. तसंच याप्रकरणी प्रगती अहवाल सादर करण्यासाठी उच्च न्यायालयानं एटीएसला पुढील तीन महिन्यांचा कालावधी दिलाय.
सुनावणीदरम्यान काय झालं : सुनावणीवेळी एटीएसचे वकील म्हणाले की, दोन्ही फरार आरोपींचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यावर गोविंद पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे यांच्या वतीनं वकील म्हणाले की, या एकूण खटल्यामध्ये 17 साक्षीदार तपासले गेले आहेत. खटला हा विशेष न्यायालयामध्ये सुरू आहे. तरी देखील अद्यापही फरार आरोपी सापडले नाहीत. त्यामुळं न्यायालयानं याबाबत संबंधित तपास एजन्सीला निर्देश द्यावे.
न्यायालयानं काय म्हटले : दहशतवाद विरोधी पथकाचे काम संथ गतीने सुरू आहे. मागील चार महिन्यात हे काही करु शकले नाहीत. तर आता एका महिन्यात काय करणार? असं म्हणत न्यायालयानं मार्च 2024 पर्यंत सुनावणी पुढं ढकलली.
पानसरे हत्या प्रकरण : 20 फेब्रुवारी 2015 ला गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि विशेष तपास पथक करत होते. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार ऑगस्ट 2022 ला हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडं वर्ग करण्यात आलं. एटीएसकडं तपास वर्ग केल्यानंतर दहा आरोपींवर आरोप निश्चित केले गेले. मात्र, यापैकी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचं काम सध्या एटीएस करत आहे.
हेही वाचा -
- Pansares Murder Case : पानसरे हत्ये प्रकरणी आरोपी तावडेचा उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याची याचिका मागे
- Govind Pansare Murder Case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्यातील आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया थांबू नका; कोल्हापूर सत्र न्यायालयाला निर्देश
- Govind Pansare murder case : गोविंद पानसरे हत्येतील आरोपी विरोधातील याचिकेत थोडी तत्परता दाखवा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला खडेबोल