मुंबई - शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवला गेला असून मुंबईत पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आलेले आहे. अशात 20 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 5 हजार 251 प्रकरणात तब्बल 10 हजार 100 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन करणार्या 1 हजार 224 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 2 हजार 536 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. तर, 6 हजार 340 आरोपींना जामिनावर सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहरात कलम 144 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 71 जणांवर कारवाई केलेली आहे.
यात विनापरवाना हॉटेल , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 5 जणांवर कारवाई, मध्य मुंबईत 25 तर पूर्व मुंबईत 4 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शिवाय पश्चिम मुंबई 25 आणि उत्तर मुंबईत 12 अशी कारवाई मुंबई पोलिसांनी केली आहे. :