मुंबई HC On Dog Bite : भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही महापालिकांची असते; पण आजही भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यात मुंबईत महापालिकेला यश आलेलं नाही. अशात श्वानांची नसबंदी हा तर केवळ फार्सच ठरत आहे. अशा परिस्थितीत हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयानं भटका कुत्रा चावल्यानंतर पीडित व्यक्तीला किमान १० हजार रुपयाचं अनुदान देण्याचा दिलेला निर्णय पीडित व्यक्तीसाठी दिलासादायक असला तरी यावरही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. (Compensation for bites by stray dogs)
१९६९ पासून कुत्र्यांची नसबंदी : उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर बोलताना, अपना होम चॅरिटेबल ट्रस्ट ॲनिमल वेल्फेअरच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता गोलानी म्हणाल्या की, कुत्रा चावल्यानंतर पीडित व्यक्तीला किमान १० हजार रुपये मिळणार या निर्णयाचं नक्कीच स्वागत आहे. परंतु, अशा पद्धतीनं किती लोकांना ही मदत दिली जाऊ शकते. हासुद्धा एक प्रश्न आहे. कारण मुंबईचं सांगायचं झालं तर मुंबईत रस्त्यावरील कुत्र्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असून कुत्र्या चावल्याच्या घटनांमध्येही त्याच प्रमाणामध्ये वाढ होत आहे. सरकारनं १९६९ पासून कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्याला आता ५४ वर्षे झाली. तरीही त्यामध्ये ते यशस्वी झालेले नाहीत. हरियाणा आणि पंजाब उच्च न्यायालयानं कुत्र्या चावल्यावर पीडित व्यक्तीला मदतीसाठी निर्णय घेतला आहे. कदाचित अशा पद्धतीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयही घेऊ शकते; परंतु हा त्यावर कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. भटक्या कुत्र्यांना एक शेल्टर होम असण्याची फार गरज आहे. जर का सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि या बाबींवर पैसा खर्च केला तर कुत्रा चावण्याच्या अप्रिय घटनांना आळा बसू शकतो, असंही डॉक्टर संगीता गोलानी यांनी म्हटलं आहे.
आर्थिक मदतीचा फायदा : हरियाणा आणि पंजाबच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना भटका कुत्रा चावल्याने पीडित २३ वर्षीय सुरज आचार्य सांगतो की, याच महिन्यामध्ये त्याला रस्त्यावरील भटक्या कुत्र्याने चावा घेतला. यासाठी त्याला चार इंजेक्शनचा कोर्स सरकारी दवाखान्यातून करायचा आहे. त्यातील तीन इंजेक्शन पूर्ण झाली असून शेवटचं इंजेक्शन बाकी आहे. तसंच ही सर्व प्रक्रिया मोफत आहे; परंतु ज्या पद्धतीनं त्याच्या पायावर जखम झाली आहे, ती जखम बरी व्हायला १५ दिवसांचा अवधी लागला. अशा परिस्थितीत त्याचे खाडे झाले. जर सरकारकडून अशा पद्धतीची आर्थिक मदत मिळत असेल तर त्याचा नक्कीच फायदा आहे; परंतु भटक्या कुत्र्यांवर आला घाळणंसुद्धा तितकंच गरजेचं असल्याचं सूरज म्हणतो.
कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं : एक महिन्यापूर्वीच वाघ-बकरी चहाचे सीईओ पराग देसाई यांचा मृत्यू भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात झाला होता. १५ ऑक्टोबरला नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला पराग देसाई निघाले होते, यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अशा प्रसंगी स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात ते रस्त्यावर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. दिवसातील २४ तासात अनेक ठिकाणी कुत्रा चावल्याच्या घटना सतत घडत असतात. अशा परिस्थितीमध्ये सरकारी दवाखान्यांमध्ये यासाठी लागणारे इंजेक्शन, औषध मोफत दिली जातात. तरीसुद्धा अनेकदा कुत्रा चावल्यानं व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांबाबत कायमस्वरूपी तोडगा काढणंही तितकचं गरजेचं आहे.
हेही वाचा: