मुंबई: विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एसटीच्या संपाबाबत बोलताना राज्यात एसटी बंद असल्यामुळे राज्यातील जनतेचे हाल होत आहेत. या प्रकरणात तोडगा काढावी, अशी मागणी केली. या विषयावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची तसेच जेष्ठ सदस्यांची समिती स्थापन करावी, अशी सूचना केली. या सूचनेवर समिती स्थापन करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सभागृहात सांगितले.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील जनता तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळेच सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन उपलब्ध बसेसच्या माध्यमातून मार्ग निश्चिती केले जातील, अशी ग्वाही परब यांनी विधान परिषदेत दिली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मी सातत्याने चर्चा करत आहे. त्यामुळे निलंबन मागे घेण्यात येईल या आश्वासनाचा पुनरुच्चार परब यांनी केला. सदाभाऊ खोत यांनी सभागृहात मांडलेले पत्र हे खोट्या सहीचे आणि बनावट असल्याचा खुलासाही परब यांनी केला.
राज्यात एसटी संपामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्यासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांची समिती नेमावी, अशी सूचना सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर सरकार सकारात्मक येत्या आठवड्यात यावर विचार करु. तसेच विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी रस्ते मार्ग प्राधान्याने सुरु केले जातील, असे परब यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी विधान परिषदेत भंडारा जिल्ह्य़ातील एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठीचा प्रश्न मांडला. शालेय विद्यार्थ्यांना एसटीच्या संपाचा फटका बसत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पहिवहन मंत्री अनिल परब यांनी यावर स्पष्टीकरण दिले. भंडारा जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यासाठी एसटीच्या अधिकार्यांच्या बैठकीत रुट रिअलायमेंट केले जातील. भंडारा जिल्ह्य़ात १५५० कर्मचार्यांपैकी १४३ कर्मचारी सेवेत परतल्याचे परब म्हणाले.