बीड- मराठा समाज आरक्षण मागणीसाठी 5 जून रोजी बीड शहरात शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे मोर्चा काढणार आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हा मोर्चा 5 जून रोजी न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती आयोजकांकडे मी स्वतः केली असल्याची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली. तर, 'मोर्चा तर निघणारच आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मराठा समाज बांधवांना अडवू नये, अन्यथा ज्या ठिकाणी पोलीस त्यांना अडवणार त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करु' असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मोर्चा काढा - जिल्हाधिकारी
सर्वोच्च मराठा समाज आरक्षण प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे व भाजपाचे नेते नरेंद्र पाटील हे बीडमध्ये 5 जून रोजी मोर्चा काढणार आहेत. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी मोर्चाचे आयोजक यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे 5 जून रोजी काढण्यात येणारा मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा पुढे ढकलावा व कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मोर्चा काढण्याची विंनती त्यांनी केली. पुढे बोलताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले, की मोर्चा काढण्यासाठी अजून दोन दिवसाचा अवधी बाकी आहे. अजून आम्ही आयोजकांकडे मोर्चा न काढण्याबाबत विनंती करणार आहोत. याशिवाय आम्ही जनतेला देखील याबाबत आवाहन केले असल्याचे जगताप म्हणाले. एकंदरीत हे प्रकरण बीडचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कशाप्रकारे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.