मुंबई - राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने अकृषी विद्यापीठातील (अव्यावसायिक) सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर अभियांत्रिकी, हॉटेल व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या संबंधित शिखर संस्थांना सूचना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. ज्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना पदवी देण्यासाठीचे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आदी संस्थांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी राज्यातील संस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे आपण संबंधित संस्थांना सूचना देऊन राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि त्यांचे सेमिस्टर रद्द करण्यात यावेत, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देत या परीक्षा तातडीने रद्द करण्यासाठी सूचना देण्याची विनंतीही पंतप्रधानांना केली आहे.