मुंबई - विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा तिढा उद्या सुटणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुलगुरुसोबत चर्चा करून परीक्षेचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
दरम्यान, ईटीव्ही भारतने कालच अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात सरकारकडे कुलगुरूंच्या समितीचा अहवाल सादर झाला असून दोन दिवसात त्याचा तिढा सुटणार असल्याचे वृत्त दिले होते.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली असून उद्या मुख्यमंत्री स्वतः राज्यातील सर्व कुलगुरूसोबत बोलून अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात निर्णय जाहीर करतील, अशी माहिती त्यांनी आज दिली. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरूंची व उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागातील दोन संचालकांची सरकारने या परीक्षा संदर्भात समिती गठीत केली होती. या समितीने गुरुवारी आपला अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या अहवालामध्ये राज्यातील एकूणच कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी शिफारशी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊनच अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय घेतला जाणार असल्याचेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, आदी अनेक प्रमुख शहरे ही सध्या रेडझोनमध्ये आले असून त्यामुळे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार होणार असल्याची भावना विविध विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात होती. अभाविप या भाजपप्रणीत संघटनेचा अपवाद सोडता इतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेला कडाडून विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काय निर्णय घेणार आहेत? हे पाहावे लागणार आहे.