मुंबई - बुलेट ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असेल तरी स्वप्नातून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर येते, असा टोमणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांना लगावला आहे. तसेच यावर सर्वांनी बसून विचार होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
यावेळी ते म्हणाले, गेल्या सरकारच्या काळातील काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे. सध्याची आर्थिक स्थिती बघून विकासाची प्राथमिकता ठरवत हे निर्णय घेण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे काय आहे, याचा विचार होणे महत्त्वाचे आहे. बुलेट ट्रेन बद्दल बोलायचे झाल्यास, बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे ? यामुळे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे? हे पटवून द्यायला हवे. तसेच यावर सर्वांनी बसून विचार होणे गरजेचे आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट जरी असला तरी स्वप्नातून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा वस्तुस्थिती आपल्या डोळ्यांसमोर येते.
हेही वाचा - विकासाचा रोडमॅप तयार; केंद्र सरकार आर्थिक कोंडी करत असल्याचाही मुख्यमंत्र्यांचा आरोप
पुनर्विकासाच्या प्रकल्पातील गुंतागुंत सोडवावी लागेल -
मुंबईतील अनेक पुनर्विकास प्रकल्पातील गुंतागुंत सोडवावी लागेल. त्यादृष्टीने काही आर्थिक संस्थांनी तयारी दाखवली आहे. यात सर्वसामान्य मुंबईकराला लवकरात लवकर स्वत:चे हक्काचे घर मिळवून देणार आहे.