मुंबई - पारतंत्र्याविरुद्ध ब्रिटिशांशी लढताना स्वातंत्र्य मिळविणे हेच एकमेव उद्दिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर होते. मात्र, आज आपण सर्वांनी भयंकर अशा विषाणूपासून आपली सुटका व्हावी म्हणून एक स्वातंत्र्य लढा उभारला आहे. या कोरोनारुपी संकटाने आपल्या स्वातंत्र्याच्या सीमा मर्यादित केल्या असल्या तरी स्वंयशिस्त, स्वच्छता पाळून, शारीरिक अंतराचे पालन करून आणि मास्क वापरून आपल्याला हे संकट परतवून लावायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) केले. 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर मंत्रालयासमोर राज्य सरकारच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हा देश, हे राज्य शूरवीर, हुतात्म्यांचे आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे आहे. या देशाला त्यागाची जशी किनार आहे, तशीच लढवय्य्येपणाची ताकदही या देशात आहे. आजघडीला हेच आपले औषध आणि हेच आपले लढण्यासाठीचे शस्त्र आहे. आपल्या एकीच्या बळावरच आपल्याला कोरोनाला हरवून आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळवायचे आहे. आपले डॉक्टर, आपल्या नर्सेस, वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा करताहेत. आज या शुभदिनी मी त्यांना नमन करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
तसेच कोरोनातून बरे झालेले नागरिकही माझ्यासाठी लढवय्ये आहेत. रक्तदान करणारे, प्लाझ्मा दान करणारे तर माझ्यासाठी सर्वात मोठे दाते आहेत. त्यांचे मी कौतुक करतो आणि आभार मानतो. हा संकट काळ पुढे किती दिवस चालेल हे माहीत नाही. मात्र, आपल्याला अतिशय सावधपणे पुढे चालायचे आहे, असेही ते म्हणाले. या संपूर्ण कोविड काळात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आपले कर्तव्य चोखपणे बजावले. मात्र, ही सेवा बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोनाला बळी पडले, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. अहोरात्र आपल्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असणाऱ्या आपल्या जवानांच्या कामगिरीचे कौतुक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांना देखील त्यांनी यावेळी अभिवादन केले. तर यानिमित्ताने राज्यातील राष्ट्रपती पदक, शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अभिनंदन केले.
राष्ट्रपतींच्या पोलीस पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ट तपासासाठी महाराष्ट्र पोलीस १० पदकांसह अग्रेसर आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या १४ शूरवीरांना अति उच्च शौर्य पदक मिळाले आहे. या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी हार्दिक अभिनंदन केले.
या कोरोना काळात सर्वधर्मियांचे महत्त्वाचे सण उत्सव येऊन गेले. आणखी येतही आहेत. मात्र, सर्वानीच संयम बाळगून, नियमांचे पालन करून शांततापूर्वक हे सणवार साजरे केले आणि देशासमोर एक उदाहरण उभे केले. मी त्यांचे देखील यानिमिताने मन:पूर्वक आभार मानतो. आता आपण आपण लॉकडाऊन नाही तर अनलॉकिंगच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याचा अर्थ आपण आपले जीवन अतिशय सावधपणे हळुहळु पुन्हा सुरू करत आहोत. हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तो कणखरपणे, संपूर्ण सामर्थ्याने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि करत राहणार आहे. आपण राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. कोरोना काळात राज्य सरकारने काही खूप चांगली पाऊले उचलली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
राज्य सरकारच्या विकास कार्यक्रमांवर बोलताना मुख्यमंत्री -
- राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन-आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला
- खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले
- चाचण्यांचे दर नियंत्रित केले
- देशात प्रथमच असा तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले.
- गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या तयार करुन गावकरी आणि लोकांवरही जबाबदारी टाकली
- आम्ही घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, आदिवासी, महिला यांना लाभ मिळाला.
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 29.50 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 980 कोटींची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून कर्जमुक्त केले.
- पणन - मागील 10 वर्षात झाली नाही इतकी विक्रमी 418.8 लाख क्विंटल कापूस खरेदी केली
- कृषी - 'जे विकेल तेच पिकेल, अशी आमची भूमिका आहे. लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या विपणनाची अद्ययावत सुविधा देणारा मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (“स्मार्ट”) जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरु केला. यामध्ये 2 हजार 100 कोटींची गुंतवणूक असणार आहे.
- दुग्धविकास - चार-साडेचार कोटी लिटर दुधाचे भुकटीत रूपांतर. ही दुध भुकटी कुपोषित आदिवासी मुले- महिलांना आपण मोफत देणार.
- आदिवासी विकास - गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत 100 टक्के अनुदान म्हणून 2 हजार रुपये रोख रक्कम आणि 2 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आर्थिक विवंचनेतील आदिवासींना दिलासा मिळेल.
- शालेय शिक्षण - आपल्याला शाळा सुरू करता आल्या नाही. मात्र, राज्यातील विद्यार्थ्याचे शिक्षण सुरू राहील याची काळजी घेतली. 'गुगल क्लासरुम' सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य.
- उद्योग - अनलॉक प्रक्रिया सुरू केल्यानंतर राज्यात आजघडीला अंदाजे 66 हजार 300 उद्योग सुरू झाले आहेत. 16 लाखांहून अधिक कामगार/ कर्मचारी वर्ग कामावर परतले आहेत. उद्योग क्षेत्रात 12 देशांतील गुंतवणूकदारांशी सुमारे 16 हजार कोटींचे सामजंस्य करार केले आहेत. आणखीही 8 हजार कोटींचे करार करीत आहोत. स्थानिकांना, मराठी माणसाला रोजगार मिळावा म्हणून शासनाने "महाजॉब्स" पोर्टल सुरू केले. मोबाईल अॅपही सुरू झाले आहे. उमेदवारांना नोकऱ्या मिळणे सुरू झाले आहे.
- गृहनिर्माण - सर्वसामान्यांना घरे मिळावीत, यासाठी देखील आम्ही विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्व प्रमुख शहरांत झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे काम सुरू होईल. भाडेकरूंना लवकरात लवकर हक्काची घरे मिळावी, म्हणूनही कायदा आणणार आहोत.
- समृद्धी (सार्वजनिक बांधकाम) - संपूर्ण जगावर करोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे सर्व व्यवस्था ठप्प असतानाही 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा'चे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या टाऊनशिपची योजना तयार होत आहे. यात मार्केटचादेखील अभ्यास केला जात आहे. २४ ठिकाणी टाऊनशिप उभारण्यात येणार आहेत.
- आरोग्य - शहर असो वा दूर दुर्गम, ग्रामीण भाग या ठिकाणी चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा कशा पोहचविता येतील? यासोबत तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रतिसाद देणारी यंत्रणा उभी करण्यावर भर राहील.
स्व. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान असा नारा दिला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, केवळ एवढेच नसावे तर 'जय जवान, जय किसान, जय कामगार' असे असावे. कामगार ही मोठी शक्ती आहे. आम्ही महाराष्ट्राचे सुराज्य करताना शेतकरी, कामगार वर्गाला डोळ्यासमोर ठेवणार आहोत. संपूर्ण देशात महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य करणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये शेवटी व्यक्त केला.