मुंबई - परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी शिवसेनेच्या नेत्याचा संबंध असल्याचे पुढे येत असतानाच, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड यांचे नाव जाहीर करत कारवाईची मागणी केली. तसेच राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
याबरोबर या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून शिवसेना मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरले जात असल्याचे समोर येताच, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील शुक्रवारी रात्री या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणी कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत.
काय आहे प्रकरण-
पुण्यातील मंमदवाडी हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेम संबंधातून या युवतीने आत्महत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती.
फडणवीस यांनीही केली चौकशीची मागणी-
या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे. सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तत्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
विविध संघटनांकडूनही चौकशीची मागणी-
पुणे पोलिसांनी या युवतीच्या आत्महत्येबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत भाजप महिला आघाडीच्यावतीने पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना याबाबत निवेदन देण्यात आलं आहे.
तसेच पूजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी बंजारा समाजाने रस्त्यावर उतरावे, या आंदोलनाचे नेतृत्व आपण करू असे आवाहन शेतकरी नेते तथा विमुक्त घुमंतू जनजाति महासभा प्रदेश अध्यक्ष मनीष जाधव यांनी बंजारा समाजाला केले आहे.
सोशल मीडियावर मंत्र्यांच्या समर्थनात स्टेस्ट्स -
पुण्यातील पूजा जाधव हिच्या मृत्यू प्रकरणी राजकीय वादळ उठले आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यात सोशल मीडियावर मंत्री यांच्या समर्थनार्थ पोस्टर युद्ध रंगत आहे. 'आम्ही आमच्या राजासोबत', 'सिधा चेहरा, इतिहास गेहेरा' यासह फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा उल्लेख पोस्टरमध्ये झळकत आहे. त्यामुळे आता विविध प्रकारच्या चर्चेला उधाण येत आहे.