मुंबई - राज्यात काही जिल्ह्यात पहिला टप्पा म्हणून कोरोनाचे काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेऊन, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांना वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मात्र कोरोनाची तिसरी लाट टाळायची असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसियांकाच्या इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट्स असोसिएशन-आहार तसेच हॉटेल ओनर्स असोसिएशन, एनआरएई या संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेणार
'आपल्याला सर्व गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरळीत आणि नेहमीप्रमाणे सुरु करायच्या आहेत. आता आपण पहिल्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामध्ये आऊटडोअर म्हणजेच मोकळ्या जागांवरील व्यवहारांवरील बंधने कमी केली आहेत. पण इनडोअर अशा गोष्टींबाबत सावधपणे पावले टाकावी लागतील. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. पुढे तिसऱ्या लाटेतही रुग्णसंख्या वाढली तर ऑक्सिजनची मागणी वाढू शकते, असे केंद्रीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आताही मोठी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांचाही ऑक्सिजन उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात येणार आहे. निर्बंध शिथिलतेनंतर संसर्ग आणि रुग्णसंख्या यांचाही आढावा घेणार आहे', असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हॉटेल व्यवसायिकांना टास्क फोर्सच्या सूचना
टास्क फोर्सचे डॉ. जोशी यांनी हॉटेल व्यवसायिकांनी कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, वातानुकूलन प्रणाली बंद करून हवेशीर व्यवस्था करावी, स्वच्छतागृहांची रचना याबाबतही सूचना केल्या.
हेही वाचा - मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राज्यात पोलिसांचे काय चाललंय; भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल