मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणतीही 'सुसाईड नोट' नव्हती. त्याविषयी कोणाचीही तक्रार नव्हती. पीडितेच्या आई-वडिलांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास दाखविला आहे. असे असताना विरोधकांकडून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरू आहे. मात्र, मुंबईत सातवेळा निवडून आलेल्या खासदाराने भाजपमधील उच्च पदस्थांची आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावे लिहून आत्महत्या केली. या प्रकरणात लेखी तक्रार असतानाही कोणी विचारत नाही? मात्र मुंबई पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासणीचा भाग म्हणून सीबीआयप्रमाणे मुंबई पोलिसांनाही दमन-दिवला जाण्यास केंद्राने सहकार्य करावे, असे आवाहन करताना भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब यांच्यासह अन्य मंत्री उपस्थित होते.
पूजा चव्हाणप्रकरणी संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी होऊन संबधितांवर कारवाई करण्यात येईल. आरोपीला मोकळे सोडले जाणार नसल्याची ग्वाही देत झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र, काहीजणांकडून सत्तेत नाही म्हणून वाटेल ते आरोप करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे योग्य नसून पोलिसांकडून योग्य तो तपास करण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी सीडीआरही नोंदविला असल्याचे मुख्यमंत्र्यांबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच परब यांनी संजय राठोड यांनी दिलेले राजीनामा पत्र आणि पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांचे पत्रही वाचून दाखविले.
मुंबई पोलिसांना केंद्राने सहकार्य करावे
सातवेळा निवडून आलेल्या खासदारावर आत्महत्येची वेळ येणे, भाजपमधील जी काही उच्चपदस्थ आहेत, त्यांच्यावर कारवाईबाबत बोलत नाही. त्यात तर आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आहे. राठोंडाबाबत सतत विचारणा होते, मग त्या आत्महत्येबद्दल का बोलले जात नाही. भाजपामधील वरिष्ठ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का होत नाही? पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना माझी विनंती आहे, मुंबई पोलिसांना चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत.
देश भंगारात काढून विकल्याची नोंद होईल
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मला फुकटचा सल्ला दिला. मला हे ऐकून बरे वाटले. भाजपवाले किमान काही तरी फुकट देतायेत हे ऐकून. पण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना किमान त्यांची जयंती कि पुण्यतिथी हे माहिती घेऊन बोलायला पाहिजे, असे सांगत आधी त्याची माहिती करून घ्या त्यानंतर बोला, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. फडणवीसांनी आमचे सरकार खोटे आणि लाचार असल्याची इतिहासात नोंद होईल, असे बोलले. त्यांना माझेही सांगणे आहे की, तुमच्या काळात देश भंगारात काढून विकायला काढल्याची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्ध्दव ठाकरे यांनी फडणवीसांना दिले.
दुतोंडी भूमिका घेऊ नका
सीमाप्रश्नी सरकारसोबत असल्याचे सांगितले. आता तर केंद्रात तुम्ही, कर्नाटकात तुम्हीच सत्तेवर आहात. पूर्वीही तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत होतात. मग त्यावेळी का सोडविला नाही सीमाप्रश्न असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आता आमच्यासोबत आहात तर सांगा तुमच्या केंद्राला आणि कर्नाटकातील सरकारला दोघे मिळून सीमावासियांचा प्रश्न सोडवू, असे आव्हान फडणवीसांना देत दुतोंडी भूमिका घेऊ नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पूजाच्या आई-वडिलांचे पत्र
कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो, आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्युच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत, जे निराधार आहेत.
आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील, त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केली नाही. आमची मुलगी गमावली परंतु, या आड राजकारण करून दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करुन संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नये.
तपासामध्ये राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा. परंतु, संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचले आहे. फक्त संशयावरून त्याचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे आणि दबावाने घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल, असे पत्र पुजाचे वडील लहू चव्हाण, आई मंदोधरी आणि बहीण दिव्याणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.