मुंबई - महिला अत्याचाराच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना अधिक बळ देण्याचे संकेत दिले आहेत. अशा घटनांमध्ये समाजकंटक ऐकत नसतील तर वेळेला फटकावलेही पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित महिला मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी संताप व्यक्त केला. महिलांवरील अत्याचार सुसंस्कृत महाराष्ट्र खपवून घेणार नाही. ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतील त्या ठिकाणी पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यात यासंदर्भात अनेक उपाययोजना करण्यात येतील. मात्र, काही कायदेही गुन्हेगारांना शिक्षा कारण्याबाबत कमी पडतात की काय अशी स्तिथी असल्याचे त्यांनी सांगितले. निर्भया प्रकरणात दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण त्यांना फासावर लटकण्यात काही अडचणी येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे समाजकंटकांवर जरब बसवण्यासाठी कायदे अधिक कठोर करून पीडितांना लवकर न्याय मिळवून, देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही ते म्हणाले.
दरम्यान , महिलांवर अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आपला संताप व्यक्त करताना आरोपींना थेट फटकवा असे आदेशच मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्रीच थेट पोलिसांना कायदा हातात घेण्यास सांगत असल्याचे चित्र असून, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.