मुंबई - शहरातील बीकेसी मैदानावर शिवसेनेने जल्लोष सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भव्य सत्कार सोहळा शिवसैनिकांकडून करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरेंनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता-भगिनी आणि बांधवांनो, अशी साद घालत शिवसैनिकच हेच माझे सुरक्षाकवच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ना आमचा रंग बदलला, ना आमचे अंतरंग बदलले असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मनसेसह भाजपला टोला लगावला. आमचा रंगही भगवा आहे आणि आमचे अंतरंगही भगवे असल्याचे ते म्हणाले. सत्काराच्या उत्तरात उध्दव ठाकरे म्हणाले, की प्राण गेला तरी मी तुमच्याशी आणि जनतेशी खोटे बोलणार नाही. मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब आहे.
मैदानातून कधीही पळ काढला नाही
मैदानात उतरल्यापासून मी कधीही पळ काढला नाही आणि काढणारही नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच हा माझा सत्कार नाही, तर तुमचा सत्कार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.