मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान राज्यभरात 'माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी' हे अभियान हाती घेतले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मला सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज भासणार आहे. १२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान अभियानाचा दुसरा टप्पा पार पडेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेले दोन दिवस विरोधी पक्षांनी समंजसपणे आणि सहकार्य करून अधिवेशन पार पाडण्यास मदत केली. राज्यातील सर्व जनतेचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी संकट काळात सरकारला पाठिंबा दिला. मार्च महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग महिन्यागणिक वाढेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला होता. कोरोनाचे संकट अधिक गंभीर होणार असून भविष्यात मोठ्या महामारीला आपल्याला सामोरे जावे लागेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे, असे ते म्हणाले.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी काल सांगितले की, ओरडून बोलल्याने कोरोनाचा प्रसार होतो. त्यांनी कालच ते सांगितले असते तर आपल्या सदस्यांना त्याचा फायदा झाला असता, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
हेही वाचा - 'महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ फक्त ९ हजार रुग्णांनाच कसा?'
मागील अधिवेशन अपूर्णावस्थेत आपल्याला संपवावे लागले. या अधिवेशनात आपण मास्क, सँनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग ठेवून अधिवेशन पार पाडत आहोत, हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचायला हवा, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तडीस नेली. आदिवासी दुर्बल घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. धनसंपत्ती बरोबरच वनसंपत्ती ही महत्त्वाची आहे. 'इगो' असला तरी चालेल परंतु, शॉर्टकट नको. आरेबाबत झालेले काम वाया जाईल, होणार नाही, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टोला लगावला.
कोरोना संकट सुरू झाले तेव्हा आपल्याकडे मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा होत्या. प्रत्येक जिल्ह्यात आपण कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारली आहे. मला राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय उभारायचे आहे. लोकांना यापुढे कोरोनाबरोबर जगायला शिकवले पाहिजे. देशात आपण सर्व प्रथम कोरोना नियंत्रणासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
१५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान 'माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी' अभियान हाती घेतले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मला सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज भासणार आहे. १२ ऑक्टोंबर २४ ऑक्टोबर दरम्यान अभियानाचा दुसरा टप्पा पार पडेल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
हेही वाचा - हिंगणा तालुक्यात डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णाचा मृत्यू