मुंबई - टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लालबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार १०० खोल्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, याप्रकरणी स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत, या संदर्भातील निर्णयाला पुढील अहवाल येईपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी तक्रारींचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते. या पत्रावर कार्यवाही करण्यात आली.
रहिवाशांना नव्या आरोग्याची समस्येची चिंता -
लालबागमधील सुखकर्ता को. ऑप सोसायटी या म्हाडाच्या इमारतीत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांकरिता आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी म्हाडातर्फे 100 खोल्यांचे वितरण करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला होता. त्यापूर्वी, राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने चांगला निर्णय घेतला, अशी चर्चा त्यावेळी होती. मात्र, 750 मराठी कुटुंबे राहत असलेल्या या इमारतीतील रहिवाशांना नव्या आरोग्याची समस्येची चिंता सतावत असल्याने, कॅन्सरग्रस्त रुग्णांची व्यवस्था भोईवाडा येथील म्हाडाच्या गृह संकुलात करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. यामुळे लालबागकरांच्या भावना शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे पोहचविल्या.
हेही वाचा - माजी मंत्री शिवतारे ICU मध्ये.. संपत्तीवरून मुलाकडून मानसिक छळ, मुलीच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ
तोपर्यंत तात्पुरती स्थगिती -
लालबागमधील इतर इमारतीमधील रहिवाशांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना याप्रकरणी दखल घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोपर्यंत हा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत १०० खोल्यांच्या संबधित निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला आहे.