मुंबई - पूर इशारा प्रणाली ही मुंबईला वरदान ठरणार असून ही सिस्टम मुंबई वाचवायला कामाला येणार आहे.' किती पाऊस येइल, कधी येईल आधी सांगता येत नव्हते. मात्र, ही प्रणाली मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते या प्रणालीच्या ऑनलाइन औपचारिक उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, हवामान विभागातील अधिकारी देखील उपस्थित होते.
पूरग्रस्त शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकारने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाला एकात्मिक पूर इशारा प्रणाली अर्थात आय-फ्लोज मुंबई (IFLOWS-MUMBAI) विकसित करण्याची विनंती केली होती. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निकट समन्वयाने पृथ्वी विज्ञान मंत्रालयामध्ये उपलब्ध असलेल्या देशांतर्गत कौशल्याचा वापर करून जुलै 2019 मध्ये आय-फ्लोज मुंबईच्या (IFLOWS-MUMBAI) विकासास सुरुवात केली. IFLOWS-MUMBAI ही मुंबई शहरासाठी एक अत्याधुनिक एकात्मिक पूर इशारा प्रणाली म्हणून विकसित केली आहे. ज्यामुळे मुंबईला विशेषत: अतिवृष्टीच्या घटना आणि चक्रीवादळादरम्यान सुरुवातीलाच इशारा देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
याबाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, किती पाऊस येईल, हे आधी सांगता येत नव्हते. मात्र, आता ही प्रणाली मुंबईसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. 2005मध्ये जेव्हा पाऊस आला होता तेव्हा आम्हाला मुंबईच्या काही गोष्टी कळल्या. त्यानंतर आम्ही पंपिंग स्टेशन बनवले. पाऊस थांबला आणि लेप्टो साथीने डोके वर काढले. मात्र, आम्ही थांबलो नाही, त्याकरता लॅब बनवली, असे ते म्हणाले. पॉलिटिकल स्ट्रोम रोखणारी यंत्रणाही तयार करावी, असा चिमटाही केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला.
कशी असणार कार्यप्रणाली
‘य-फ्लोज प्रणालीत डेटा एकीकरण, पूर, जलप्रलय, असुरक्षा, जोखीम, प्रसार मॉड्यूल आणि निर्णय पाठिंबा प्रणाली अशी सात मॉड्यूल आहेत. या प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकॉस्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), भारतीय हवामान विभाग (आयएमडी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटोरॉलॉजी (आयआयटीएम), यांनी तयार केलेल्या रेन गेज नेटवर्क स्टेशनवरील फील्ड डेटा, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आयएमडी, एमसीजीएमद्वारे प्रदान केलेल्या भू-वापरावरील पायाभूत सुविधा आदी समाविष्ट केल्या आहेत.